
कागल : कर्नाटकातील सीमावासीय मराठी बांधवांचे कागलला कागल शहर आणि कोल्हापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोषी स्वागत केले.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुढाकाराने ही रॅली बेळगावकडून राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापूरला चालली आहे. झेंडा आणि पुष्पगुच्छ देऊन कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. रहेगे तो महाराष्ट्र मे……. नही तो जेल मे….! अशा घोषणा देऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकत्यांनी परिसर दणाणून सोडला . बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर – भालकीसह संयुक्त महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा, अशी साद सीमा भागातील या अन्यायग्रस्त मराठी बांधवांनी घातली.
आठवड्यापूर्वी कर्नाटक सरकारने बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला परवानगी नाकारली होती. तसेच, आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरातून बेळगावला मेळाव्याकरिता चाललेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना रोखले होते. या निषेधार्थ कोल्हापुरातील धरणे आंदोलनासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे शेकडो कार्यकर्त्यांचे आयबीपी पेट्रोल पंपावर मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.
माजी आमदार के. पी. पाटील, कोल्हापूरचे माजी महापौर आर. के. पोवार, टीडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना भगवा ध्वज आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी बाबा पार्टे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विजय देणे, रविकिरण इंगवले प्रमुख उपस्थिती होती. या रॅलीत एकीकरण समितीचे माजी आमदार मनोहर किणेकर, बेळगावचे माजी महापौर शिवाजीराव सुंटकर, प्रकाश मगराळे, कृष्णा हुंदरे, सरस्वती पाटील, रेणू किल्लेकर, सुनिल अष्टेकर, मालोजी अष्टेकर, हनमंत मजुकर, मुरलीधर पाटील यांच्यासह सीमा भागातील बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.* *माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, कर्नाटक सरकार सीमाभागातील मराठी बांधवांची मोठी गळचेपी करीत आहे. दोन्ही राज्यात भाजपा सरकार असून हे सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.* *”आमच्या हयातीत सीमा प्रश्न सुटेल का…..?”**बेळगाववरून कोल्हापूरकडे जाणाऱ्या या मराठी बांधवांच्या रॅलीमध्ये काही वयोवृद्ध नेतेमंडळी व कार्यकर्तेही सहभागी झाले होते. आमच्या हयातीत सीमा प्रश्न सुटेल का? असे लिहिलेला फलक त्यांच्या हातामध्ये दिसत होते.