
मुंबई – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी हिंदू देवीदेवतांबद्दल केलेल्या विधानामुळे त्या अडचणीत सापडल्या आहेत.या वक्तव्यामुळे अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी वारकरी संप्रदायाने केली आहे.

साहजिकच, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.राज्यात शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदे – ठाकरे असे दोन वेगळे गट निर्माण झाले. या परिस्थितीत सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. विरोधकांवर थेट आक्रमक हल्ला करणाऱ्या सुषमा अंधारे अत्यंत कमी काळात शिवसेना ठाकरे गटाच्या तोफ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. मात्र सुषमा अंधारेंनी केलेल्या विधानांमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अंधारे यांच्या विधानामुळे विश्व वारकरी सेनेने त्यांच्याविरोधात शपथ घेतली आहे.पश्चिम बंगालच्या गंगासागर समुद्र किनाऱ्यावर शपथ घेत सुषमा अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. “मी आजपासून शपथ घेतो की, ज्या पक्षामध्ये सुषमा अंधारे राहतील त्या पक्षाला मतदान करणार नाही”, अशा प्रकाराचा शेटे यांचा व्हिडिओ समोर आला आहे. येत्या काळात महाराष्ट्रात अनेक वारकरी अशाप्रकारे शपथ घेतील असं शेटे यांनी सांगितले. त्यामुळे सुषमा अंधारे यांच्या विधानांमुळे ठाकरे गटाची गोची झाली आहे.
