
पूणेः आज 350 वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांवरचं जनतेचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही. विविध धर्मियांकडून पुणे बंदला प्रतिसाद मिळाला. शिवरायांबद्दलचं हे प्रेम वाढतच जात असतानाच काही लोकांना महाराजांनी देशासाठी, महाराष्ट्रासाठी काय योगदान दिले समजावून सांगावं लागत आहे. महाराजांचा योग्य सन्मान व्हावा, हे सांगण्याची वेळ आमच्यावर आली आहे, हीच मोठी शोकांतिका आहे, अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.

पुण्यात आज महाविकास आघाडी तसेच विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांमार्फत कडकडीत बंद पाळण्यात आला. पुण्यात डेक्कन ते लाल महालापर्यंत विविध संघटनांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मूक मोर्चा काढला.असंख्य संघटनांनी पुणे बंदच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांचे आभार मानले. छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या नेत्यांवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
