
नवी दिल्ली : दक्षिण कोरियन आणि अमेरिकन चित्रपट पाहिल्यामुळे उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनने दोन विद्यार्थ्यंना मृत्यूदंडाची शिक्षा दिली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हा दावा करण्यात आला आहे. उत्तर कोरियामध्ये इतर देशाचं संगीत आणि चित्रपट पाहण्यावर बंदी आहे. कुणीही असं करताना आढळल्यास त्याला कठोर शिक्षा दिली जाते.
द इंडिपेंडेंट वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचं वय 16 आणि 17 वर्ष असल्याचं सांगण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांनी उत्तर कोरियातील रयांगांग प्रांताच्या शाळेत दक्षिण कोरियन आणि अमेरिकन ड्रामा शो पाहिला. द मिरर वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, या विद्यार्थ्यांनी दक्षिण कोरियन आणि अमेरिकन चित्रपट पाहिल्याने दोन्ही विद्यार्थ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. ही घटना ऑक्टोबर महिन्यात घडल्याचं सांगण्यात येत आहे, पण या घटनेची माहिती गेल्या आठवड्यात समोर आली.
