
भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील आणि प्रशांत परिचारक यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
भीमा सहकारी साखर कारखान्यासाठी मतदान केल्यानंतर कारखान्याचे अध्यक्ष असलेल्या खासदार धनंजय महाडिक यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान भाजपमध्ये येऊ इच्छिणाऱ्या माजी आमदार राजन पाटील यांच्या भाजपच्या प्रवेशावरच महाडीक यांनी आक्षेप घेतलाय. ते बोलताना म्हणाले की, राजन पाटील यांचे अनेक घोटाळे आहेत. त्यामुळेच ते भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत असं धक्कादायक विधान धनंजय महाडिक यांनी केलंय.धनंजय महाडीक बोलताना म्हणाले की, राजन पाटील भाजपमद्धे येण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांचे अनेक घोटाळे आहेत. त्याचबरोबर नक्षत्र दारू निर्मिती कारखान्याचा त्यांनी 25 कोटी रुपयांचा कर चुकवला आहे. या प्रकरणामध्ये त्यांचे संपूर्ण कुटुंबीय जामिनावर बाहेर आहे. या घोटाळ्यात त्यांना आतमध्ये जावे लागणार आहे. त्यामुळे भाजपमध्ये जाऊन आपल्याला संरक्षण मिळेल असा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. मात्र भाजप हा सुसंस्कृत पक्ष आहे. त्यामुळे अशा मनोरुग्ण प्रवृत्तीला प्रवेश मिळेल असे वाटत नाही, असंही महाडिक म्हणाले आहेत.
