‘या’प्रकरणी जिल्ह्यातील सर्व नेत्यांना एकत्रित करणार-अमल महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यभरातील गायरान जमिनींवरील अतिक्रमण काढण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. परंतु,गायरानप्रश्नी सर्वपक्षीय नेत्यांना एकत्रित घेऊन मार्ग काढू. तसेच ‘या’प्रकरणी राज्यसरकार नक्कीचं सकारात्मक पाऊल उचलेलं असा विश्वासही माजी आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केला.

यासाठी मी स्वतः पुढाकार घेऊन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील नेतेमंडळींना एकत्रित घेऊन मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हा कोणत्याही एका पक्षाचा किंवा व्यक्तीचा विषय नसून जिल्ह्यातील लाखो नागरिकांच्या निवाऱ्याचा प्रश्न आहे. तेव्हा या नागरिकांसाठी म्हणून जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते एकत्रित येतील आणि शिंदे-फडणवीस सरकार याबाबत सकारात्मक पाऊले उचलून गोरगरीब जनतेला नक्कीचं न्याय मिळवून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या निर्णयामुळे राज्यातील लाखो कुटुंबं बेघर होतील. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे प्रमाण जास्त असल्याने जवळजवळ सव्वालाख कुटुंबाना याचा फटका बसणार आहे. गावखेड्यांमध्ये विविध कारणांमुळे आजतागायत नियमित न होऊ शकणाऱ्या कुटुंबांसाठी हा निर्णय अन्यायकारकच आहे. जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांचा या निर्णयाला विरोध आहे. अनेक ठिकाणी याबाबत स्थानिक पातळीवर बैठका होत असल्याचेही पाहायला मिळत. त्यामुळे सर्वांनी वेगवेगळ्या दिशेने पळण्यापेक्षा एकत्रित येऊन यावर पर्याय शोधण्यासाठी प्रयत्न करावेत असे मत अमल महाडिक यांनी व्यक्त केलं आहे.