पन्हाळा (प्रतिनिधी) : कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर काल रात्री बोरपाडळे गावच्या कमानीजवळ गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाला आहे. चालकाचा ताबा सुटल्याने हा टँकर पलटी झाला.

या अपघातात गॅस टँकरची टाकी लिकेज होऊन गॅस गळती सुरू आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव कोडोली ते बोरपाडळे हा मार्ग पोलिसांकडून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा गॅस टँकर जयगडहून नागपूरला जात होता. अपघाताची माहिती मिळताच पन्हाळाचे तहसीलदार रमेश शेंडगे, कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड, जिल्हा आपत्ती व्यवस्थानचे कर्मचारी, दोन क्रेन, अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी रात्रीच दाखल झाले.
कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गावर बोरपाडळे हॉटेल पासून कोडोली आणि कोडोली ते बोरपाडळे हा रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पोलिसांनी बंद केलाय. अपघातस्थळ परिसरातील सुमारे तीनशे मीटर पर्यंत असलेली सर्व हॉटेल, दुकाने, बंद करण्यात आली आहेत. तसेच या परिसरात घरात राहणाऱ्या नागरिकांना स्थलांतरीत केल असून घरातील चुली पेटवण्यास बंदी घालण्यात आली आहे.
