‘त्या’ सर्वांची देणी देण्याची जबाबदारी आमची-आ.हसन मुश्रीफ

गडहिंग्लज (प्रातिनिधी) : शेतकऱ्यांचे वैभव असलेला गोडसाखर कारखाना कामगारांनी जीवापाड जपला आहे. कारखान्याच्या सेवेत असणाऱ्या आणि सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचीही सर्वच देणी देण्याची जबाबदारी आमची आहे, असा विश्वास आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला. कामगार बंधूंनो, तुम्ही विश्वासाने साथ द्या. कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्प, सहवीज प्रकल्प उभारणीसह विस्तारीकरण व आधुनिकीकरणाने ऊर्जितिवस्था निश्चित आणू अशी हमी देखील मुश्रीफ यांनी दिली. हरळी ता.गडहिंग्लज येथे आयोजित गोडसाखरच्या कामगार मेळाव्यात ते बोलत होते.

पुढे बोलताना आमदार मुश्रीफ म्हणाले की, ज्या कंपनीने कारखाना सुरळीत चालविला होता, त्यांना तो सोडून जायला विरोधकांनी भाग पाडले. त्या कंपनीने स्टेट बँक आणि युनियन बँकेचा सात कोटीहून अधिक रक्कमेचा फास काढला होता. कामगार बंधूंनो, या कारखान्याला उर्जित अवस्था आणून विस्तारीकरणासह आधुनिकीकरण इथेनॉल प्रकल्प आणि सविस्तर प्रकल्प करणारच, असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना डॉ.प्रकाश शहापूरकर म्हणाले की, मी कामगार विरोधी आहे, असा बागुलबुवा करीतच विरोधकांनी कामगारांना भडकावून सोडले. त्यांनी कारखाना खाऊन संपविला हे समजायला वीस वर्षे लागली, असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना प्रकाशराव चव्हाण म्हणाले की, विरोधकांनी कारखान्याचे वाटोळे केले. कारखाना बंद आणि दीड-दीड वर्षे पगार नाहीत. ही दहा वर्षांपूर्वीची अवस्था आजही झाली आहे. स्वतःला कामगार नेते म्हणून घेणारे शिवाजी खोत हे कुठून आणि कसे कामगार नेते झाले? असा सवालही त्यांनी केला. कारखाना उर्जीत अवस्थेत आणण्यासाठी कामगारांनी साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी बोलताना सतीश पाटील- गिजवणेकर म्हणाले विरोधकांनी केलेल्या काटामारीचे तुम्ही सर्वजण साक्षीदार आहात. शेतकऱ्यांनी रक्त आटवून पिकवलेल्या ऊसाच्या मापात त्यांनी केलेली पापे आहेत. शेतकरी सभासदच त्यांचे डिपॉझिट जप्त करुन त्याना अद्दल घडवतील.

दरम्यान,शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र गड्ड्यांवर, प्रा.किसनराव कुराडे, सतीश पाटील, जयसिंग पाटील, निखिल शीरकोळे यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी माजी संचालक बचाराम मोहिते, माजी संचालक अरुणकाका हरळीकर, विनायक उर्फ अप्पी पाटील, नानाभाई पताडे आदी प्रमुखांसह उमेदवार उपस्थित होते. सुरेश रेडेकर यांनी आभार मानले.

🤙 9921334545