कोल्हापूर (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दि. ४ आणि ५ नोव्हेंबर २०२२ रोजी शिर्डी येथे राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसाठी ‘राष्ट्रवादी मंथन: वेध भविष्याचा’ या दोन दिवसीय अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आ.हसन मुश्रीफ यांनी आज (शुक्रवारी) आयोजित पत्रकार परिषदेत दिली.पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या वर्तमान स्थिती संदर्भातील आकलन वाढावे.भविष्यातील आव्हानांचा वेध घेण्यासाठी त्यांनी सज्ज व्हावे आणि राष्ट्र तसेच समाजाबद्दलची बांधिलकी भक्कम व्हावी या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या शिबिरामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच राज्यातील विविध क्षेत्रातील विचारवंत अभ्यासात मार्गदर्शन करणार आहेत. पक्षाच्यावतीने सभासद नोंदणी मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत असून ही मोहीम गतिमान करून ग्रामीण तसेच शहरी भागात कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे निर्माण करण्यात येत आहे असे आ.हसन मुश्रीफ यावेळी म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा प्रमाण मानून राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल गेली २३वर्षे दमदारपणे सुरू आहे. पक्षाचा वैचारिक पाया भक्कम असल्यामुळे महाराष्ट्रा पुढे निर्माण झालेल्या अनेक आव्हानात्मक प्रश्नांच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांनी राज्याला योग्य दिशा दाखवली, असेही मुश्रीफ यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना मुश्रीफ म्हणाले की, देशासमोर, राज्यासमोर अनेक प्रश्न असताना व्हाट्सअप यूनिवर्सिटी च्या माध्यमातून चुकीची माहिती प्रसारित करून लोकांना संभ्रमित करण्याचे प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केले जातात. या पार्श्वभूमीवर विविध प्रश्नांसंदर्भातील नेमके वास्तव काय आहे, त्या संदर्भातील नेमकी आव्हाने कोणती आहेत आणि त्यांना सामोरे कसे जाता येईल या संदर्भातील चर्चा या शिबिरामध्ये करण्यात येणार आहे. बदलत्या काळाची गरज ओळखून पक्षाचा डिजिटल चेहरा अधिक प्रभावी बनवण्यात येत आहे.
या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी शहराध्यक्ष आर.के.पोवार, के.पी. जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.