शिरोली : शिरोली गावतलावाच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या सुशोभीकरणाचा लोकार्पणाचा कार्यक्रम सरपंच आणि चौकडीपुरता मर्यादित स्वरूपात पार पडला. या कार्यक्रमातून उंदराला मांजर कशी साक्ष देते, याचे उत्तम उदाहरण उपस्थितांना पाहायला मिळाले, असा टोला हातकणंगलेच्या माजी सभापती आणि भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस डॉ.सोनाली सुभाष पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे लगावला.

डॉ. सोनाली पाटील म्हणाल्या, 2016 साली आमचे नेते अमल महाडिक यांनी सदर तलावाच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव मांडला आणि सातत्याने निधीसाठी पाठपुरावा केला. तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या सहकार्यामुळे कामाला गती मिळाली. असे असूनही या कार्यक्रमामध्ये सरपंचानी सर्व श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. एवढयावर प्रकार थांबला नाही, तर ज्यांचा या सगळ्यामध्ये काडीचा वाटा नाही त्या आमदारांनीसुद्धा संधी बघून महाडिकांवर टीका-टिप्पणी केली. मुळात कार्यक्रम तलावाचा होता की महाडिकांवर टीकाटिप्पणी करण्यासाठी आयोजित केला होता हेच शेवटपर्यंत समजले नाही.
पुढच्या निवडणुकीत खवरेंना सदस्यही होते कठीण होईल
डॉ. पाटील म्हणाल्या, कार्यक्रमात सरपंच काय म्हणाले किंवा आमदार काय म्हणाले यामध्ये मी पडणार नाही. पण जितकं ते बोलले तितकंच काम जर समाजासाठी त्यानी केलं असेल, तर त्या कामांची यादी घेऊन त्यांनी कधीतरी जनतेसमोर यावं. मागील पाच वर्षात या दोघांमुळे शिरोलीत किती निधी आला आणि आमच्या नेत्यांकडून किती निधी आला हे लोकांसमोर आलं तर पुढच्या निवडणुकीत खवरेंना सरपंचपद नव्हे, सदस्यपदावरही निवडून येणं कठीण होऊन जाईल. त्या तलावाच्या संवर्धनासाठी आमच्या नेत्यांनी आटोकाट प्रयत्न करून निधी आणून दिला. पण त्याअंतर्गत मंजूर झालेल्या कामांपैकी किती कामे सरपंचांनी पूर्ण केली हा संशोधनाचा विषय आहे. बाकी काही असो-नसो, पण 2-4 वर्षात तिथून मोठ्या प्रमाणात गाळ काढण्याचं काम सरपंचानी अव्याहतपणे केलं, एवढं निश्चित ! आता तो गाळ कशासाठी काढला ? कोणी काढला ? आणि मुळात प्रत्यक्षात काढला की त्या नावावर फक्त पैसेच काढले हा आणखी मोठा संशोधनाचा विषय आहे.
आमदार साहेबांनी स्वतःच्या भविष्याची चिंता करावी.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, सरपंचांचे असे अनेक उद्योगधंदे आहेत ज्यावर एक महिला म्हणून बोलायलाही मला लाज वाटते. पण त्यांना जर स्वतःच्या पायरीचा विसर पडत असेल तर आज ना उद्या कोणीतरी या सगळ्या उद्योगधंद्यांचाही लेखाजोखा जनतेसमोर ठेवलेच. राहिला विषय आमदार साहेबांचा.. तर त्यांना मी एवढंच सांगेन की, ज्या कोरोनाच्या काळात तुमच्या पक्षाचे नेते आणि तुमचे सहकारी जिल्हा परिषदेत भ्रष्टाचार करत होते, त्या काळात इथे महाडिक कुटुंबीय स्वखर्चातून अन्नधान्य वाटप करत होते. इतकंच नव्हे तर अमल महाडिक 100 बेडचं कोव्हीड सेंटर स्वखर्चातून चालवत होते. कदाचित त्यावेळी पैसे खाण्यात व्यस्त असणाऱ्यांना या गोष्टी दिसल्या नसतील. तरीही आमदारांना जर विश्वास नसेल तर कधीतरी त्यांनी महापूरकाळात शिरोलीला यावं. हजारो आश्रितांना जेवण देण्याचं पुण्यकर्म इथे अव्यहातपणे चालू असतं, त्यात 1-2 लोकं आणखी जेवण करून गेली तर आम्हाला दुःख वाटणार नाही. पण किमान त्यानिमित्ताने आमदारांना महाडिकांची दानत आणि काम करण्याची पद्धत तरी कळेल. विधानसभा फार दूर नाही, त्यामुळे आमदार साहेबांनी टीकाटिप्पणी करण्यापेक्षा स्वतःच्या भविष्याची चिंता करावी. कोणाची विनाकारण बदनामी करणे किंवा दुसऱ्याच्या कामाचं श्रेय लुटणे हे आमचे राजकीय संस्कार नाहीत. पण काही लोकांना आरसा दाखवण्यासाठी त्यांना समजेल त्या भाषेत बोलावं लागतं. त्यामुळे इथून पुढे पुन्हा असं बोलण्याची वेळ येऊ नये किंवा आणखी सविस्तर खुलासा करायला लागू नये, याची काळजी आमच्या विरोधकांनीच घ्यावी, असा टोलाही त्यांनी लगावला.