शेतकऱ्यांना अनुदान मिळाले यातच आमची दिवाळी गोड झाली-समरजित घाटगे

सेनापती कापशी (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकारने प्रामाणिकपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान न देता तोंडाला पाने पुसली. मात्र,शिंदे-फडणवीस सरकारने हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले.यामुळेच शेतकऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड झाली आहे.अशी भावना शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी व्यक्त केली.जैन्याळ (ता.कागल) येथे आनंदा मांगोरे यांच्या गोमातेच्या अवसुबारस पूजन वेळी ते बोलत होते.

दोन वर्षांपूर्वी त्यांनी प्रामाणिकपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानसह शासनाकडून महापूर, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी भरपाई मिळावी. यासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याची शिवार संवाद यात्रा काढली होती. भुदरगड तालुक्यातील या शिवार संवाद यात्रेची सुरुवात त्यांनी वसुबारस पूजनाने दारवाड येथे केली होती. कोळवण येथे शेतकऱ्यांनी अतिवृष्टीने खराब झालेले पीक व विळा भेट देऊन शासन दरबारी आवाज उठवण्यासाठी शेतकऱ्यांनी साकडे घातले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना मदत मिळणे यातच माझी दिवाळी गोड आहे. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. त्यांना मदत मिळवून देईपर्यंत मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे असा लाख मोलाचा आधार दिला होता .

काल (शुक्रवारी) वसुबारस पूजनाच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रामाणिकपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहन अनुदान जमा करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर आज  त्यांनी शेतकऱ्यांसोबत हे वसुबारस पूजन केले. यावेळी समरजित घाटगे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल चिकोत्रा परिसरातील शेतकऱ्यांनी सत्कार केला. साखर पेढे वाटून व फटाक्यांची आतषबाजी  करून आनंदोत्सवही साजरा केला. यावेळी सरपंच हौसाबाई बरकाळे,उपसरपंच रुक्मिणी बरकाळे, कर्नल शिवाजी बाबर, संजय बरकाळे, शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे,शिवाजी भोंगाळे, सदाशिव भोंगाळे आदी उपस्थित होते.

🤙 9921334545