कोल्हापूर (प्रतिनिधी) : जयप्रभा स्टुडिओमध्ये राज्य सरकारने तातडीने लक्ष घालावे, हा स्टुडिओ संपविण्याचा घाट घालणाऱ्या कुणालाही सरकारने पाठीशी न घालता स्थानिक कलाकारांची साद ऐकावी व जयप्रभा स्टुडिओला गतवैभव मिळवून द्यावे, अशा शब्दात स्वराज्य संघटनेचे प्रमुख माजी खासदार संभाजीराजे यांनी राज्य सरकारला सुनावले आहे. संभाजीराजे यांनी याबद्दलचे ट्विट केले आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ कोल्हापुरात रोवली गेली. जिथे अनेक नामवंत मराठी व हिंदी चित्रपटांचे शूटिंग झाले, तो शाहूपुत्र छत्रपती राजाराम महाराजांनी सुरू केला, या कलानगरीचा कणा असणारा ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओ हा विकसकाच्या घशात घातला जात आहे असे ट्विट संभाजीराजेंनी केले आहे.
वैभवशाली मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्णकाळाची नोंद करणाऱ्या कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओ वाचवण्यासाठी गेल्या 250 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. गेल्या 250 दिवसांपासून आंदोलन करूनही कोणतीच कार्यवाही होत नसल्याने आज स्टुडिओ वाचवण्यासाठी आत्मदहन आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये चांगलीच झटापट झाली.
जयप्रभा स्टुडिओ चित्रिकरणासाठी तत्काळ खुला झाला पाहिजे, स्टुडिओमधील इमारतीमधील खुली जागा आरक्षित रहावी, व चित्रीकरण सोडून कोणताही व्यावसायिक वापर होऊ नये, कोल्हापूर मनपाने स्टुडिओ व्यावसायिक तसेच वाणिज्य वापरासाठी देऊ नये, स्टुडिओचे जतन होण्यासाठी राज्य शासन आणि मनपाने लक्ष घालावे, आदी मागण्यांसाठी जयप्रभा स्टुडिओ बचाव आंदोलन गेल्या 250 दिवसांपासून सुरु आहे.