जि.प.मध्ये दिव्यांग सहाय्यकारी साधने दुरुस्ती शिबिराचे उद्धाटन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दिव्यांगांच्या सहाय्यकारी साधनांची दुरुस्ती करण्याच्या शिबिराचा शुभारंभ आज (शुक्रवारी) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात जिल्हास्तरीय दिव्यांग कल्याण निधीतून दिव्यांग व्यक्तींच्या सहाय्यकारी साधनांची दुरुस्ती करण्यासाठी ५० टक्के अनुदान देणे ही योजना हाती घेण्यात आली आहे.

यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, दिव्यांग बांधवांना सामाजिक न्यायाच्या भावनेतून मदत करण्यासाठी दीव्यांग सहाय्यकारी साधनांची स्वस्तात दुरुस्ती करण्याबाबतची योजना महाराष्ट्रामध्ये प्रथमच कोल्हापूर जिल्हा परिषदेने हाती घेतली आहे. समाजाने दिव्यांग बांधवांसाठी सहाय्यकारी साधने व प्रशिक्षण उपलब्ध करणे तसेच त्यांनी तयार केलेल्या वस्तूंच्या मार्केटिंगसाठी मदत केल्यास ते आयुष्यात समर्थपणे उभे राहतील.

 यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे, जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुख, हेल्पर्स अँड हॅंडीकॅप संस्थेचे उपाध्यक्ष मनोहर देशभ्रतार, संघटक श्रीमती रेखा देसाई व समाज कल्याण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

🤙 9921334545