कोल्हापूर (प्रतिनिधी) : हजारो वर्षापासून दुग्धव्यवसाय हा भारतातील प्रमुख व्यवसायांपैकी एक आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसायामुळे निर्माण झालेला समतोल आणि शाश्वत अर्थचक्राचे प्रमुख योगदान आहे असल्याचे प्रतिपादन गोकुळचे संचालक डॉ.चेतन नरके यांनी केले. पुणे येथे आयोजित दूध परिषदेत “डेअरी उद्योगातील शाश्वत अर्थचक्र” या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

पुढे बोलताना डॉ.नरके म्हणाले, भारतामध्ये हजारो वर्षांपासून पशुधनाच्या माध्यमातून एक शाश्वत अर्थव्यवस्था निर्माण झाली आहे. यामध्ये मानवी जीवनातील सर्व घटकांचा विचार झाला आहे. समाजव्यवस्था, लोकजीवन, लोकसंस्कृती, पर्यावरण, अर्थकारण, महिला सबलीकरण असे सर्व विषय व्यापले आहेत. या व्यवसायातील कृत्रिम रेतन, वासरू संगोपन, आरोग्य सेवा, पशु खाद्य, वैरण निर्मिती, गोठा व्यवस्थापन, दूध आणि दुधापासून निर्माण होणारे असंख्य उपपदार्थ अगदी गोमूत्र आणि शेण सुद्धा आर्थिक स्त्रोत अर्थव्यवस्थेत हातभार लावतात. भारतात सुरवातीपासूनच शेण आणि मूत्राचा वापर हा शेती साठी उपयुक्त असल्याने कृषी क्षेत्र पशुसंवर्धन केल्याशिवाय पूर्णत्वास जाऊ शकत नाही.
शेण आणि मुत्र याचा शेती, बायोगॅस, ऊर्जा निर्मिती, यासाठी होत असलेल्या वापरातून मिथेन सारख्या समस्येपासून आपल्या देशाने फार पूर्वीपासून उपाय मिळवला आहे. आणि मूल्यवर्धित वापर आणि उत्पादनातून नवी अर्थ साखळी निर्माण केली आहे. ज्याठिकाणी दुग्ध व्यवसाय आहे येथील एकाही शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आलेली नाही यावरून डेअरी उद्योगाचे योगदान लक्षात येते.
दूध उत्पादनात जगात प्रथम क्रमांकावर असणाऱ्या भारत देशासमोर येत्या १० वर्षात ३३३ मिलिअन मेट्रिक टन दूध उत्पादनाचे आव्हान आहे. हे दूध जागतिक दर्जाच्या मानांकनाची पूर्तता करणारे, प्रतिजैविके विरहीत असले पाहिजे. याकरिता चांगल्या दर्जाचे वाण निवडणे ते विकसित करणे, अत्युच प्रतीच्या वैरण आणि खाद्य व्यवस्थापनाच्या माध्यमातून रोग प्रतिकारक क्षमता वाढवणे, वातावरणीय बदलाचा परिणाम दूध उत्पादनावर होऊ नये म्हणून कृत्रिम उपाययोजना करणे, लम्पी सारख्या अचानक पणे उद्भवणाऱ्या आजारांना आणि नैसर्गिक संकटाना तोंड देण्यासाठी प्रभावीआपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा उभी करणे. पशुधनाचे डिजिटल ओळखपत्र तयार करणे, बॅलन्स डेअरी इको सिस्टीम निर्माण करणे, या साखळीतील प्रत्येक घटकापासून मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती करत अधिक नफ्याचे गणित साध्य करणे अशी आव्हाने आपल्यासमोर आहेत. यासाठी इथून पुढच्या काळात शासन, प्रशासन आणि याक्षेत्राशी निगडीत सर्व घटकांनी एकत्र येऊन दीर्घकालीन कृती आराखडा आणि डेअरी क्षेत्राच्या विकासासाठी पोषक धोरणे आखण्याची भूमिका घेतली पाहिजे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नव्या तरुण पिढीला या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी व्यवसायिक दृष्टीकोनातून या व्यवसायातील कौशल्ये आणि व्यवस्थापनाचा विकास करणे याची गरज आहे. तरच हि शाश्वत अर्थव्यवस्था कोणत्याही जागतिक स्पर्धेला समर्थपणे तोंड देऊ शकेल.
यावेळी चितळे डेअरीचे गिरीश चितळे, गोविंद मिल्क चे डॉ. शांताराम गायकवाड, फूड लॅबचे डॉ.राजेंद्र कोकणे यांच्या सह महाराष्ट्रातील डेअरी उद्योगातील मान्यवर तसेच दूध उत्पादक उपस्थित होते.