मुंबई (वृत्तसंस्था) : अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या ३ नोव्हेंबरला होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाची उमेदवारी मिळालेल्या ऋतुजा लटके यांचा राजीनामा मुंबई महानगरपालिकेने स्वीकारला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राजीनामा स्वीकृती पत्र पालिकेने लटके यांना दिलं आहे. त्यामुळे आज लटके यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. आज दुपारी १२ च्या आसपास लटके या आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत.
निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, नोकरीचा राजीनामा दिला तरच लटके या निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करू शकत होत्या. त्यामुळेच त्यांनी उच्च न्यायालयालामध्ये पालिकेने तातडीने राजीनामा स्वीकारावा असे आदेश देण्यासंदर्भातील याचिका दाखल केली होती. न्यायालयाने लटके यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर पालिकेने राजीनामा स्वीकारला आहे.