गांधीनगर : सणासुदीच्या काळात गांधीनगर बाजारपेठेतील वीज खंडित होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा करवीर शिवसेनेच्यावतीने वीज वितरणचे सहाय्यक अभियंता अश्विनकुमार सूर्यवंशी यांना निवेदनाव्दारे देण्यात आला.
गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड होलसेल व रिटेल, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रीकल व फर्निचरी प्रमुख बाजार पेठ आहे. गेली दोन वर्ष कोरोनामुळे लोकांनी सण-समारंभ मोठ्या प्रमाणात साजरे केले नाहीत. त्यामुळे नागरिकांनी बाजारपेठेत खरेदीही कमी प्रमाणात केली. तसेच गांधीनगर बाजारपेठेतील दुकान गाळ्यांचे भाडेही खूप आहे. त्यामुळे दुकानदारांना आर्थिक घडी बसवताना खूप मोठी कसरत करावी लागत आहे.सध्या कोरोनाचे नियम शिथिल झाल्यामुळे सण उत्सव हे मोठमोठ्याने साजरे होत आहेत. सध्या हिंदूचा दिवाळी व दसरा हे सण आहे. त्यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. त्यामुळे दुकानदारांची आता कुठे आर्थिक घडी सुरळीत होत आहे. बाजारपेठेमध्ये सतत वीज खंडीत होत असते. त्यामुळे दुकानदारांना व्यवसाय करण्यासाठी मोठी अडचण होते. सदर सणाला गांधीनगर बाजारपेठे मधील वीज खंडित होवू नये जरी काही विजेचे काम करायचे असेल तर ते काम जलद गतीने करून बाजार पेठेतील सतत वीज खंडीत होणार नाही या बाबत आपण दक्षता घ्यावी, अन्यथा करवीर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करणेत येईल असा इशारा शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आला.
या मागणीचे निवेदनात करवीर शिवसेनेच्या वतीने गांधीनगर वीज वितरणचे सहाय्यक अभियंता अश्विनकुमार सूर्यवंशी यांना देण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांनी विजेची जी काही काम आहेत ती जलद गतीने पूर्ण करून सणासुदीच्या काळात वीज खंडित होणार नाही याची दक्षता घेऊ, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, योगेश लोहार, सुरेश किल्लेदार, आबा जाधव, बाबुराव पाटील, दिपक अंकल, सुनील पारपाणी, किशोर कामरा, दिपक फ्रेमवाला, शंकर चंदवानी, राजेश सचदेव, भगवान पंजवाणी, जित चावला आदी उपस्थित होते.