संजयबाबा व मी एकमेकांचे विरोधक,शत्रू नाही-आ.हसन मुश्रीफ

कागल प्रतिनिधी : माजी आमदार संजयबाबा व मी एकमेकांचे विरोधक होतो. आम्ही वैयक्तिक शत्रू कधीही नव्हतो, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.  महाविद्यालयापासूनच एकमेकांचे मित्र असलेले आम्ही व्यक्तिगत द्वेष, दुश्मनी आणि कटूता न ठेवता खिलाडूवृत्तीने राजकारण व समाजकारण करीत राहिलो, असेही ते म्हणाले. पिंपळगाव बुद्रुक ता.कागल येथे तीन कोटी निधीच्या विकासकामांचे उद्घाटन व कामगारांना सुरक्षा साहित्य वाटप अशा संयुक्त कार्यक्रमात आमदार मुश्रीफ बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार संजयबाबा घाटगे होते.

मनोगत भाषणात बोलताना आमदार मुश्रीफ पुढे म्हणाले की, माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी प्रतिकूल परिस्थितीतही कार्यकर्त्यांना जीवापाड सांभाळले.  त्यांनी दिलेले पाठबळ हे आमचे मनोबल वाढविणारे आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी प्रसंगी एखादा-दुसरा पाऊल आम्ही मागे घेऊ. परंतु; संजयबाबांच्या कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवू , असेही ते म्हणाले.

यावेळी माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, आमदार हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा लौकिक महाराष्ट्रासह सर्व देशभर वाढविला. बँकेचे अध्यक्ष म्हणून बँकेच्या गाडीसह भत्ता व कोणत्याही सोयी-सुविधेचा लाभ त्यांनी घेतला नाही. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी हिम्मत असेल तर आधी ही पथ्ये पाळावीत आणि मग टीका करावी, असेही ते म्हणाले.

केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, आमदार हसन मुश्रीफ सरकारी योजनाच राबवीत असल्याची टीका समरजीत घाटगे करीत आहेत. आमदार हसन मुश्रीफ व माजी आमदार संजयबाबा घाटगे हे गोरगरीब जनतेचे ब्रँड आहेत. ते जहागीरदारी आणि राजेशाहीचे पुरस्कर्ते नाहीत.           

स्वागतपर भाषणात अजित पाटील म्हणाले, आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी कोणत्या गावाने मते किती दिली, याचा कधीही विचार केला नाही. सर्वच गावांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी मोठे योगदान दिले.कार्यक्रमात गावातील गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचेही सत्कार झाले.         

यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ जिल्हापरिषद सदस्य युवराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास पाटील, पोलीस पाटील बापूसाहेब पाटील, शामराव पवार, उपसरपंच युवराज डाफळे, दत्ता पाटील, सतपाल माने, सोनबा माने, शंकर पाटील, पंडित सूर्यवंशी, केशव माने, भरत पाटील, सदाशिव माने, शरद पवार आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.स्वागत अजित पाटील यांनी केले. प्रास्ताविक रघुनाथ माने यांनी केले. सूत्रसंचालन विवेक गवळी यांनी केले. आभार सरपंच बंडेराव माने यांनी मानले.

🤙 8080365706