नवी मुंबई वृत्तसंस्था : हायकोर्टाने दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचं मैदान ठाकरे गटालाच देण्याचा निर्णय दिला. त्यामुळे ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या पहिल्या न्यायालयीन लढाईत ठाकरे गटाचा मोठा विजय झाला आहे.

२ ते ६ ऑक्टोबरपर्यंत शिवाजी पार्कच्या वापराची परवानगी ठाकरे गटाला दिली आहे. न्यायालयाने शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिल्याने शिवसेनेच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे.
दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचं मैदान कुणाला या प्रश्नावरुन हायकोर्टात मोठं घमासान झालं. ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट विरुद्ध मुंबई महापालिका असा सामना हायकोर्टात रंगला. कोर्टाने आजच्या अन्य सुनावणी बाजूला ठेवत, दसरा मेळाव्याबाबत सविस्तर सुनावणी घेतली. त्यानंतर तिन्ही बाजूचे दावे ऐकल्यानंतर कोर्टाने आपला निर्णय ठाकरे गटांच्या पारड्यात टाकला.