करवीर प्रतिनिधी : प्रयाग चिखली (ता.करवीर) येथे जय शिवराय तरुण मंडळाच्या रौप्य महोत्सवानिमित्त माऊलीचा रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा रिंगण सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला.

ज्ञानोबा माऊलीच्या नामाचा जयघोष, टाळ मृदंगाचा गजर या सर्वांमुळे भावभक्तीमय झालेल्या वातावरणामुळे चिखली मध्ये आषाढी वारी सोहळ्याचे चित्र पहायला मिळाले. यावेळी, नागरिकांनी रिंगणात धावणाऱ्या अश्वांच्या (घोड्यांच्या) टापा खालची माती लावण्यासाठी गर्दी केली होती. रिंगण सोहळ्याच्या निमित्ताने गावातील ग्रामस्थांनी घरोघरी रांगोळीचा सडा, फुले पसरली होती. हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी परिसरातून नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, जय शिवराय तरुण मंडळाच्या रौप्य महोत्सवानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रम राबवण्यात आले.