सोलापूर प्रतिनिधी : करमाळा तालुक्यातील केम जवळ मालगाडी रुळावरून घसरली. रात्री ३ वाजून ४० मिनिटांनी ही घटना घडल्याची माहिती रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली. सोलापूरहुन पुण्याच्या दिशेने ही मालगाडी जात होती.

सिमेंट घेऊन जाणाऱ्या या मालवाहतूक गाडीचे समोरील दोन इंजिन आणि दोन डबे रुळावरून खाली घसरले. गाडी शेतात मातीत जाऊन थांबली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या आपत्कालीन व्यवस्थेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घसरलेली मालगाडी ही लूप रूळवर होती. त्यामुळे अधिक वेळ वाहतूक बंद नव्हती. सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी या मार्गावरील रेल्वे वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. मात्र मालगाडी रुळावरून घसरण्याचे कारण चौकशीनंतर समोर येईल.अशी माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली.