हातकणंगले येथील पोलिसास लाच घेताना अटक

हातकणंगले (प्रतिनिधी) : कौटुंबिक न्यायालयातील अटक वॉरंट कामकाजात मदत करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना हातकणंगले पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक नामदेव औदुंबर कचरे (वय 36 रा. उचगाव,ता.करवीर ) याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले.

या बाबतची अधिक माहिती अशी, या गुन्ह्यातील तक्रारदाराची कर्नाटकातील धारवाड येथील कौटुंबिक न्यायालयात खटला सुरू आहे. या खटल्यात अनेक तारखांना तक्रारदार हजर नसल्याने त्याच्या विरोधात कोर्टाने अटक वॉरंट जारी केले होते. तक्रारदाराला अटक न करता या प्रकरणात मदत करण्यासाठी पोलीस नाईक कचरे यांनी तक्रारदाराकडे तीन हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर लाचेची रक्कम दोन हजार रुपये ठरली. त्यानंतर तक्रारदाराने 29 ऑगस्ट रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पोलिसांनी 29 आणि 30 ऑगस्ट रोजी तक्रार तक्रारीची खातरजमा केली. त्यानंतर आज शुक्रवारी पोलिसांनी सापळा रचला. हातकणंगले पोलीस ठाण्याच्या बाजूस रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यांवर तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलिसांनी त्याला रंगेहात पकडले.

 

या कारवाईत पोलीस अधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, पोलीस उपनिरीक्षक संजय बंबरगेकर, हेड कॉन्स्टेबल शरद पोरे, विकास माने ,सुनील घोसाळकर,नवनाथ कदम, मयूर देसाई, रुपेश माने, विष्णू गुरव यांनी कारवाईत भाग घेतला.