कोल्हापूर : तृतीयपंथीयांनाही मान सन्मानाने जगता यावे, यासाठी त्यांच्या सबलीकरणाची गरज आहे. तृतीयपंथीयांच्या आर्थिक सबलीकरणासाठी केडीसीसी बँक अग्रेसर असेल, असा विश्वास बँकेच्या अध्यक्ष व आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
बँकेच्या मुख्य कार्यालयात कळंबा ता. करवीर येथील अर्धनारी तृतीयपंथी महिला बचत गटाला पासबुक वितरण कार्यक्रमात श्री. मुश्रीफ बोलत होते. अर्धनारी तृतीयपंथी महिला बचत गटाच्या अध्यक्षा मयुरी शिवाजीराव आळवेकर, सचिव अंकिता मयुरी आळवेकर व सभासदांनी हे पासबुक स्वीकारले.
यावेळी बोलताना आमदार हसनसाहेब मुश्रीफ म्हणाले, समाजात तृतीयपंथीयांनाही पुरुष आणि स्त्रियांइतकेच सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी केडीसीसी बँक नेहमीच पुढे आलेली आहे. अशा बचत गटाना सहा महिन्यातच उद्योग- व्यवसायासाठी कर्जपुरवठाही केला जाईल.
बँकेच्या महिला विकास कक्षाच्या उपनिरीक्षक सौ. गिरीजा पुजारी म्हणाल्या, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत अपंग, वयोवृद्ध, वेश्याव्यवसायातील महिला, मानवी मैला वाहतूक करणा-या व्यक्ती व तृतीयपंथीय यासारख्या विशेष व्यक्तींचे गट स्थापन करण्यासाठी बँकेने पुढाकार घेतला आहे.
“बचतगट स्थापनेला मिळणार चालना…..”
आमदार श्री. मुश्रीफ म्हणाले, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बँकेने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पहिल्या टप्प्यात कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तृतीयपंथीयांच्या बचत गटांच्या स्थापनेला चालना दिली जाणार आहे. त्यापाठोपाठ कोल्हापूर शहरासह तालुकानिहाय गावागावांमध्ये तृतीयपंथीयांच्या बचतगट स्थापनेला गती दिली जाईल.
यावेळी बँकेचे उपाध्यक्ष आमदार राजूबाबा आवळे, माजी खासदार श्रीमती डॉ. निवेदिता माने, ए. वाय. पाटील, बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, सुधीर देसाई, संतोष पाटील, सौ. स्मिता गवळी, सौ. श्रुतिका काटकर आदी संचालक व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने उपस्थित होते.
करवीरचे गटविकास अधिकारी जयवंत उगले यांनी स्वागत केले. ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या करवीर तालुका अभियान व्यवस्थापक सौ. आरती पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन महिला व बाल समुपदेशन केंद्राच्या अधीक्षिका सौ. शुभांगी तानाजी चौगुले यांनी केले. पाचगावच्या प्रभाग समन्वयक सौ. पूजा शिंदे यांनी आभार मानले.