कोल्हापूर : प्रत्येकाच्या जीवनातील आठवणी चिरंतन करणार्या फोटोग्राफर आणि व्हिडीओग्राफर यांच्याकडे प्रशासनाचं कायम दुर्लक्ष झाले आहे. मात्र आता असोसिएशनच्या माध्यमातून हे व्यावसायिक संघटीतरित्या आवाज उठवतायत, ही चांगली सुरवात आहे. फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी व्यवसायाला उद्योगाचा दर्जा मिळावा, यासाठी आपण पाठपुरावा करू, अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
कोल्हापुरात फोटोग्राफर, व्हिडीओग्राफर ऍन्ड एडिटर्स असोसिएशनच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कोल्हापुरातील छायाचित्रकार आणि व्हिडीओग्राफर यांच्याशी संबंधीत घटकांची शिखर संस्था असलेल्या पी.व्ही.ई.ए.के. या संघटनेचा वर्धापनदिन आणि जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष जगदिश गुरव असोसिएशनच्या उपक्रमांबाबत माहिती दिली. संघटनेच्यावतीने सभासदांना व्यवसायासाठी सर्व प्रकारची मदत केली जाते. कोरोना काळात सभासद आणि त्यांच्या कुटुंबीयांना वेळेवर वैद्यकीय उपचार, बेड, इंजेक्शन मिळावेत, यासाठी संघटनेने प्रयत्न केले. तसेच संघटनेच्यावतीने सभासदांचा मोफत विमा उतरवण्यात आला. पूरबाधित झालेल्या फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी व्यावसायिकांना असोसिएशनने रोख मदत आणि प्रापंचित साहित्याचे वाटप केल्याचे गुरव यांनी सांगितले.
उपाध्यक्ष अमर जाधव यांनी असोसिएशनच्या मागण्या मांडल्या. फोटोग्राफी आणि व्हीडीओग्राफीच्या व्यवसायात कार्यरत असलेल्या महिलांचा सत्कार खासदार महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. असोसिएशनच्यावतीनं सप्टेंबर महिन्यात भरवण्यात येणार्या प्रदर्शनाच्या लोगोचे उद्घाटन खासदार महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, कोरोना काळात सर्व असंघटीत वर्गाला शासनाने मदत दिली. मात्र फोटोग्राफी व्यावसायिक त्यापासून वंचित राहीले. त्यामुळे या व्यवसायाला उद्योगाचा दर्जा मिळावा, यासाठी पाठपुरावा करू.
यावेळी संघटनेचे सचिव सायलस मनपाडळेकर, सुरेश मोरे, संतोष जकाते, विनायक कुचगावे, युवराज राऊत, प्रभात चौगले, अभिषेक शिवदास, शंभू ओवुळकर, संतोष सुर्वे, रितेश आगेजा, कुमार सुतार यांच्यासह संचालक आणि सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.