चिखलीकरांनी स्थलांतरित व्हावे; शासनाचे आवाहन

प्रयाग चिखली (वार्ताहर) : मुसळधार पावसामुळे करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली परिसरात पुन्हा एकदा पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून पावसाचा जोर कायम राहिला तर चिखली ग्रामस्थांना दुसऱ्यांदा स्थलांतरित व्हावे लागण्याची शक्यता आहे. तशा सूचना शासकीय पातळीवर ग्रामस्थांना सोमवारी देण्यात आल्या आहेत दरम्यान ग्रामस्थांची पुराची धास्ती वाढली आहे.

शनिवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे नदी पात्रामध्ये असलेल्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झाली असून संगम परिसरात अवघ्या दोनच दिवसात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान मुसळधार पाऊस, आणि धरणातील वाढलेला पाण्याचा साठा, परिणामी प्रचंड वेगाने वाढणारे पुराचे पाणी अशा स्थितीमुळे चिखली आंबेवाडी गावाला कोणत्याही क्षणी पुराचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे येथील ग्रामस्थात सोमवारी दिवसभरात अस्वस्थता दिसून आली. शासकीय पातळीवर ग्रामस्थांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.