पन्हाळगडाच्या संवर्धानासाठी शिवप्रेमींचा ‘एल्गार’

पन्हाळा (प्रतिनिधी) : ऐतिहासिक पन्हाळगडाची दिवसेंदिवस दुरवस्था होत चालली आहे.गेल्या काही वर्षापासुन पन्हाळ्याच्या दुर्दशेची मालिका सुरु असुन देखील शासनास्तरावरुन कोणतिही हालचाल होत नाही. याच्या निषेधार्थ  शिवप्रेमी व गडप्रेमी आक्रमक झाले असुन आज पन्हाळ्याच्या संवर्धानासाठी एल्गार पुकारण्यात आला.

पन्हाळगडाचे संवर्धन होण्यासाठी राज्य सरकारने गडकिल्ल्यांसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करावी, तातडीने संवर्धन करून पुरातत्व विभागाने सहकार्याची भुमिका घ्यावी,अशी मागणी करत रविवारी किल्ले पन्हाळगडावर राज्यातील शिवप्रेमी हजारोसंख्येने जमा होवुन भव्य मोर्चा काढण्यात आला. राज्य सरकारने सकारात्मक भुमिका न घेतल्यास शिवप्रेमी त्यांच्या स्टाईलने न्याय मागतील, असा इशाराही राज्य सरकारला यावेळी देण्यात आला.

प्रत्येक पावसाळ्यात पन्हाळगडावरील तटबंदीसह ऐतिहासिक बुरुजांची पडझड होऊ लागली आहे.याकडे पुरात्त्व विभागाने सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गडप्रेमी व शिवप्रेमीनी केला आहे.पुरात्त्व विभागाला जागे करण्यासाठी राज्यातील गडप्रेमी व शिवप्रेमी पन्हाळगडावर हजारोच्या संख्येने रविवारी सकाळी दाखल होते. यामध्ये पुणे, नाशिक, परभणी, उस्मानबाग, नागपुर, मुंबई येथील शिवप्रेमीचा सहभाग उल्लेखनीय होता.सकाळी अकरा वाजेपर्यंत पन्हाळगडावरील धान्याचेकोठार (अंबरखाना) येथे जमून आंदोलनात सहभागी शिवप्रेमी व गडप्रेमींना संबोधित करण्यात आले.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय..! जय भवानी..जय शिवाजी..!हर..हर..महादेव च्या जयघोषाने पन्हाळगड दुमदुमुन गेला होता.यानंतर अंबरखाना पासुन बाजीप्रभु पुतळ्याचे येथे अभिवादन करुन मेनरोड, प्रांत कार्यालय,संभाजी महाराज मंदिर,एस.टी.स्टँड मार्गे मोर्चा काढण्यात आला. छ.ताराराणी यांच्या राजवाडा येथे मोर्चाची सांगता करण्यात आली.

यावेळी गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी महामंडळ स्थापन करावे.राज्यातील सर्व गड किल्ल्यांचे संवर्धन करावे. प्रत्येक गडकिल्ल्याच्या नावाने ट्रस्ट करावेत. त्यामध्ये गडप्रेमींना स्थान असावे.गडकिल्ल्यांवर प्लास्टीक बंदी करावी. गड किल्ल्यावर येताना हिंदू धर्माचा पेहराव असावा. गड किल्ल्यावर चित्रपटाच्या चित्रीकरणास बंदी करावी. किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण हटवावे. प्रत्येक गडकिल्ल्यावर भगवा ध्वज ३६५ दिवस फडकवावा आदी मागण्यांचे  निवेदन पुरात्त्व  पन्हाळा विभागाचे अधिकारी विजय चव्हाण यांच्याकडे सादर करण्यात आले.