हुपरीत तृतीयपंथीयाला स्वीकृत नगरसेवक पदाचा मान!

कोल्हापूर : हुपरी नगर परिषदेच्या आज पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत तृतीयपंथी व्यक्तीला स्वीकृत नगरसेवक म्हणून सन्मान देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.

कोल्हापूर सारख्या पुरोगामी जिल्ह्यात एका तृतीयपंथीला स्वीकृत नगरसेवक म्हणून मान देण्यात आला आहे. हुपरी नगरपरिषदेनं पहिल्यांदाच तृतीयपंथीयाला स्वीकृत नगरसेवक म्हणून मान देत वंचित वर्गासाठी राजकीय मार्ग आणखी प्रशस्त केला आहे. तातोबा बाबूराव हांडे ऊर्फ देव आई असे त्यांचे नाव आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सभागृहात तातोबा हांडे यांच्या रूपाने प्रथमच तृतीय पंथीयास प्रतिनिधित्व करण्याचा सन्मान कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीने मिळवून दिला आहे.

तृतीयपंथी हा देखील आपल्या समाजाचा एक घटक आहे. मात्र, रूढी परंपरेमुळे तृतीयपंथीयांना समाजातून वगळण्यात येते. अशावेळी हुपरी नगर परिषदेने घेतलेला निर्णय संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्शवत आहे.

ताराराणी पक्षाचे राहुल आवाडे यांनी या निर्णयानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले की, तृतीयपंथी समाजाच्या खूप समस्या आहेत. त्यांना अपमान सहन करून जगावं लागतं. जोगवा मागून आपल्या पोटाची खळगी भरतात, त्यामुळे यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न हुपरी नगर परिषदेने केला आहे.