दिल्लीच्या कार्यालयाचा ताबा देण्याचीही खासदारांनी केली मागणी    

नवी दिल्ली (वृतसंस्था) : एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेला आणखी एक हादरा देण्याची तयारी केलेली आहे. संसदेतलं शिवसेना कार्यालय ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात कार्यालयाचा ताबा देण्याचीही मागणी खासदारांनी केली आहे. आमच्याकडे दोन तृतियांशपेक्षा अधिक बहुमत असल्याचं सांगत गटनेते पदावरही शिंदे गटाने दावा केला. आता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला याबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभेचं अधिवेशन बोलावण्यात आले . तेव्हाही अशाच चर्चा झाल्या होत्या. दोन दिवसांच्या या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुंबईच्या विधिमंडळातील शिवसेनेच्या कार्यालयाला कुलूप लावण्यात आलं होतं.

लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन शिवसेनेचे 12 खासदार दिल्लीत एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले. या भेटीचा पहिला फोटो समोर आला. शिंदेंना भेटायला गेलेल्या खासदारांमध्ये श्रीकांत शिंदे, भावना गवळी, हेमंत गोडसे, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, श्रीरंग बारणे यांच्यासह 12 खासदारांचा समावेश होता.