कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मा.आ.राजेश क्षीरसागर यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री कविंद्र गुप्ता उपस्थित होते.
यावेळी राजेश क्षीरसागर यांनी जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. दरम्यान, राजेश क्षीरसागर यांनी जिल्ह्यातील सन २०१९ व २१ च्या महापुरातील पूरग्रस्तांची प्रलंबित मदत, व्यापाऱ्यांची नुकसान भरपाई, शेतकऱ्यांचे थकीत अनुदान, पूरग्रस्त नागरिकांना घरफाळ्यात सवलत, संभाव्य पूरस्थितीत आवश्यक्त आपत्कालीन यंत्रणा, पूरस्थिती नंतर रोगराई प्रतिबंधक उपाययोजना व विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन आदी बाबत माहिती दोन्ही मंत्र्यांना दिली. यासह पूरस्थितीबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासन स्तरावर आराखडा तयार करून आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्याची पाणीपातळी तसेच पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला, तर प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे आश्वासनही दिले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच कोल्हापूर दौऱ्यावर येण्याचे आश्वासन दिले.