वीज दरवाढीविरोधात ‘आप’ची निदर्शने

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महावितरणने इंधन समायोजन आकारात सातपट वाढ केल्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या वतीने आज (बुधवारी) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. महावितरणने इंधन समायोजन आकारात सातपट वाढ करून वीज ग्राहकांना झटका दिला आहे. या दरवाढीमुळे एकूण वीजबिलात १५ ते २० टक्के वाढ होणार आहे. ही दरवाढ जूनपासून लागू होणार असल्याने आम आदमी पार्टीच्या वतीने याविरोधात निदर्शने करण्यात आली.

यामध्ये घरगुती वापर करत असलेल्या ग्राहकांना इंधन समायोजन आकारात १ ते १०० युनिटसाठी १० पैसे वरून ६५ पैसे, १०१ ते ३०० युनिटसाठी २० पैसे वरून १ रुपये ४५ पैसे, तर ३०१ ते ५०० युनिटसाठी २५ पैसे वरून २ रुपये ५ पैसे इतकी दरवाढ केली आहे.

या दरवाढीचा झटका सामान्यांना बसणार आहे. आधीच पेट्रोल-गॅसच्या दरांमध्ये झालेल्या दरवाढीमुळे नागरिक हैराण झाले आहेत, त्यातच झालेली ही वीज दरवाढ अन्यायकारक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचे शिष्य म्हणवतात, खरी शिवसेना त्यांचीच आहे असे सांगतात. ते जर खरे शिष्य असतील तर मागील निवडणुकीत दिलेल्या वचननाम्यात सांगितल्यानुसार ३०० युनिट पर्यंतच्या बिलात ३० टक्के सूट द्यावी असे आवाहन ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना केले.

इंधन समायोजन आकाराचे दर पूर्वरत करावेत. त्यामध्ये कोणतीही वाढ करण्यात येऊ नये, सर्व वीज कंपन्यांचे सी ए जी ऑडिट करावे, तसेच १ एप्रिल २०२० पासून केलेली वीज दरवाढ मागे घेण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे राज्य सरकारकडे करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा सचिव दिलीप पाटील, उत्तम पाटील, संतोष घाटगे, सूरज सुर्वे, विशाल वठारे, अभिजित कांबळे, राज कोरगावकर, ऋषिकेश वीर, प्रथमेश सूर्यवंशी, राजेश खांडके, विजय हेगडे, बसवराज हदीमनी, भाग्यवंत डाफळे, डॉ. कुमाजी पाटील, रवींद्र ससे, प्रकाश हरणे, मंगेश मोहिते, संजय नलावडे आदी उपस्थित होते.