पर्यावरणपूरक गणेशमूर्ती; जिल्हा परिषदेचा नाविण्यपूर्ण उपक्रम

कोल्हापूर (प्रतिनिधी) : या वर्षीचा गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक साजरा व्हावा यासाठी प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या गणेशमूर्ती देखील पर्यावरणपूरक असाव्यात या हेतूने आज जिल्हा परिषद कोल्हापूर येथे नैसर्गिक सामग्री व शाडूची माती वापरून तयार केलेल्या मूर्ती प्रायोगिक प्रकल्पांतर्गत ठेवण्यात आल्या आहेत.

उदय पाटील व मारूती पाटील (रा. कंथेवाडी, ता. राधानगरी) यांनी आयुर्वेदिक औषधे, वनस्पती व शाडूची माती, मुलतानी माती, हळद, गेरू इ. घटकांचा वापर करून गणेश मुर्ती तयार केल्या आहेत. या मुर्ती कुंडामध्ये विसर्जन केल्यानंतर राहिलेली माती शेतीसाठी किंवा बागांसाठी खत म्हणून वापरता येते. तसेच वाहत्या पाण्यात मुर्ती विसर्जित केल्यानंतर मुर्तीमधील नैसर्गिक द्रव्यांमुळे नदीमधील पाणी शुध्द होण्यास मदत होईल. जलचर प्राण्यांना मुर्तीमधील खाद्य घटक मिळतील व त्यांना कोणत्याही प्रकारची इजा होणार नसलेने या मुर्तीपासून पर्यावरणाचे रक्षण होणार आहे. यामुळे जल प्रदूषणास आळा बसणार आहे. अशी माहिती मुर्तीकार उदय पाटील यांनी दिली .

    

या कार्यक्रम प्रसंगी संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक, जिल्हा परिषद, कोल्हापूर, अरूण जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं), प्रियदर्शिनी मोरे (प्रकल्प संचालक), आशा उबाळे (शिक्षणाधिकारी), डॉ. विनोद पवार ( पशुसंवर्धन अधिकारी), भीमाशंकर पाटील, (कृषी विकास अधिकारी), पांडूरंग भांदिगरे ( माजी जिल्हा परिषद सदस्य), अमर पाटील तसेच जिल्हा परिषद कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मुर्तीकार मारुती पाटील व उदय पाटील यांनी उपस्थितांना मुर्तीबाबत माहिती दिली.