कोल्हापूर (प्रतिनिधी) : संभाव्य पूर परिस्थितीच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील यांनी रामानंदनगर परिसराला भेट देऊन पाहणी केली. यानंतर त्यांनी रामानंदनगर तालीम मंडळाच्या कार्यालयात बैठक घेऊन स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे रामानंद नगर परिसरात पुराचे पाणी शिरल्यामुळे मोठे नुकसान झाले होते. यावर्षी संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार ऋतुराज पाटील यांनी या परिसरात भेट देऊन आढावा घेतला.
यावेळी नागरीकांसोबत आमदार पाटील यांनी बैठक घेतली. बंद असलेले पथदिवे, उन्मळून पडलेल्या झाडांचे वाहतूकीसाठी होत असलेले अडथळे, ओढ्यातून वाहून आलेल्या झाडांमुळे पाण्याच्या प्रवाहाला होत असलेला अडथळा या समस्यांकडे आमदार ऋतुराज पाटील यांचे नागरिकांनी लक्ष वेधले. आमदार पाटील यांनी या समस्यांची तातडीने दखल घेत महानगरपालिकेच्या विद्युत आणि उद्यान विभागाच्या अधिकार्यांना तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
रामानंदनगर तालीम मंडळाच्या इमारतीमध्ये भरत असलेल्या अंगणवाडीमधील सेविका आणि कर्मचार्यांची आमदार पाटील यांनी आपुलकीने चौकशी करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.यावेळी रणजीत पाटील, यावेळी माजी नगरसेवक सुनील पाटील, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, संजय पाटील, संतोष जरग, प्रमोद भोपळे, सतीश भाले, संजय वाडकर, शितल नलवडे, वैभव देसाई आदींसह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मदतीसाठी तत्काळ संपर्क साधा :
संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनातर्फे सर्व उपायोजना करण्यात आल्या आहेत. सर्व कोल्हापूकरांना विनंती आहे की, काही सखल व नदीकाठच्या भागांमध्ये पाणी वाढल्यास प्रशासनाला सहकार्य करून सुरक्षितस्थळी तत्काळ स्थलांतरित व्हावे. कोणतीही मदत हवी असल्यास आपल्याशी तत्काळ संपर्क करावा असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले.