बंडाचे कारण ठरवण्यासाठी ‘त्यांनी’ कार्यशाळा घ्यावी : संजय राऊत

मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी पहिल्या दिवशी आपण हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेतून बाहेर पडल्याचं सांगितले. नंतर राष्ट्रवादी निधी देताना दुजाभाऊ करत असल्याचं सांगितलं. त्यामुळे बंडखोर आमदारांनी शिवसेनेतून बाहेर का पडलो? याचं एक कारण ठरवावं. पाहिजेतर त्यासाठी बंडखोर आमदारांनी एक कार्यशाळा घ्यावी, असा टोला खासदार संजय राऊत  यांनी शिंदे गटातील आमदारांना लगावला.

प्रसारमाध्यमाशी बोलताना राऊत म्हणाले, जे संदिपान भुमरे आता टीका करत आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये तेच मंत्री झाल्यावर मला लोटांगण घालत होते. राठोडांवर गुन्हा दाखल झाला तरी आम्ही त्यांच्यासोबत होतो. शरद पवार हे जागतिक स्तराचे नेते आहेत. मोदी, गडकरी त्यांचा आदर करतात. त्यांचं कौतुक करतात. महाराष्ट्रातील आपल्या लोकांचं कौतुक होतं ही मोठी गोष्ट आहे. पवारांचं कौतुक नाही करायचं तर कोणाचं करायचं, असा सवाल राऊत यांनी विचारला.

राऊत म्हणाले, ‘शरद पवार साहेबांसोबत राजकीय चर्चा झाली, वर्तमान भविष्य आणि भूतकाळ विषयी चर्चा झाली. महाविकास आघाडीतले सगळे नेते आम्ही लवकरच भेटणार आहोत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली अशा चर्चा यापुढे सुद्धा होत राहतील असं राऊत म्हणाले.