मुंबई : मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज, सोमवारी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधासभेत भाषण झालं. मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर अजित पवार यांच्या नावाला विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृतरित्या मान्यता देण्यात आली.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार यांचा दबदबा होता. उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्रीपद अशी दोन्ही महत्वाची पदे अजित पवार यांच्याकडे होती. तसेच राज्याच्या विधानसभेचा विरोधी पक्षनेता हा खरंतर ‘शॅडो मुख्यमंत्री’ म्हणून ओळखला जातो. विधानसभेत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे ५३ आमदार आहेत. तर शिवसेनेचे ५५ आमदार असले तरी बंडखोरीमुळे ३९ आमदारांनी वेगळा मार्ग स्वीकारला आहे. शिंदे गटाकडून त्यांचा गटच मूळ शिवसेना असल्याचा दावा केला असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. अशात विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आले असून अजित पवार नवे विरोधी पक्षनेते म्हणून आगामी काळात कार्यरत राहणार आहेत.