एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री

मुंबई : राज्याचे ३० वे मुख्यमंत्री म्हणून आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. भाजपने शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना पाठिंबा देऊन एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशिर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे शपथ घेतो, असं म्हणत शिंदेंनी शपथ घेतली. यावेळी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे यांच्यासह भाजपातील इतर नेते उपस्थित होते. तसेच, या शपथविधी समारंभाला एकनाथ शिंदेंच्या कुटुंबियांनीही हजेरी लावली.

विधानपरिषदेत्या तब्बल ११ दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर आज अखेर या नाट्याच्या शेवट झाला. काल रात्री माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा होत्या. दुपारपर्यंत माध्यमांवर आणि सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री हेच फिरत होतं. मात्र, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी राजभवनात जाऊन राज्यपालाची भेट घेत त्यांना सत्तास्थापनेचा प्रस्ताव दिला. त्यानंतर पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार असल्याचं फडणवीसांनी जाहीर केल.

फडणवीस मुख्यमंत्री न झाल्याने नाराज झाले होते, अशी चर्चा आहे. त्यांनी मंत्रिमंडळात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. पण केंद्रीय नेतृत्वाने फडणवीस यांची मनधरणी करत फडणवीसांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घ्यावी, असा आग्रह केल्यावर त्यांनी उपमुख्यमंत्री पदांची शपथ घेतली.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, बॅ. बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर ८ वर्षांनंतर पुन्हा सातारा जिल्ह्याला मुख्यमंत्रीपदाचा मान मिळाला आहे.