कोल्हापूर : ज्यांच्या सत्तेच्या काळात शिक्षक बँकेचा परवाना रद्द करण्याची नामुष्की आली होती, त्यांना बँकेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. स्वतःच्या चेअरमन पदाच्या काळात आपण काय दिवे लावलेत हे सुज्ञ सभासदांना माहित आहेत. त्यामुळे सतरा भानगडी असणाऱ्या विरोधकांना सुज्ञ सभासद जागा दाखवतील असा घणाघात राजाराम वरुटे यांनी केला.
कबनूर (ता. हातकणंगले) येथे शिक्षक संघाच्या सत्तारूढ पॅनेलच्या प्रचार मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सुकाणू समितीचे दा. श. सुतार होते.
वरुटे म्हणाले, विरोधी संघ समिती पॅनलप्रमुख रवीकुमार पाटील हे बँकेचा नफा खोटा असल्याचे बोलत आहेत, त्यांच्या या अज्ञानाची कीव करावी वाटते, बँकेच्या लेखपरिक्षणातून नफ्याची आकडेवारी जाहीर होते.
पूर्वी ज्यादा झालेला एनपीए लक्षात घेऊन रिझर्व बँकेने शिक्षक बँकेचा परवाना रद्द करण्याचे ठरवले होते. परंतु २०१० साली मोठ्या विश्वासाने सभासदांनी आमच्या सर्व १७ संचालकांना निवडून दिले.त्यापासून सर्व संचालकांनी काटकसरीचा कारभार करून शिक्षक सभासदांची आर्थिक संस्था वाचवली. शिक्षक संघ कामात देखील अग्रेसर राहिला आहे. एमएससीआयटी, मुख्यालयी राहण्याची अट, आगाऊ वेतनवाढ, विज्ञान प्रमोशन या व अन्य शिक्षकांच्या समस्यांसाठी नेहमीच पाठपुरावा केला आहे. सभासदांनी या दोन पंचवार्षिक काळात विश्वास दाखवला तो विश्वास सार्थ ठरवला आहे.
विद्यमान संचालक राजमोहन पाटील म्हणाले, शिक्षक संघाच्या नेतृत्वाने हातकणगले तालुक्यावर प्रचंड मोठा विश्वास टाकत तीन उमेदवार दिले आहेत.या तिन्ही जागा निवडून आणल्याशिवाय एकत्र स्नेहभोजन करणार नाही.
बँकेचे चेअरमन बाजीराव कांबळे म्हणाले, शिक्षक बॅंकेची निवडणूक लागल्यापासून अनेक संघटनांचा पाठिंबा मिळत असून ‘प्रत्यक्ष काम’ ही शिक्षक संघाची ओळख आहे. सत्तारूढ शिक्षक संघाचे पॅनेल सभासदांच्या मनामनात असल्यामुळे हे पॅनल विजयी हॅटट्रिक साधणार.
यावेळी उमेदवार अनिल चव्हाण,संभाजी सिद,अनिता निटवे, बाबा साळोखे, शिवाजी पाटील, डीसीपीएस संघटनेचे सर्जेराव सुतार, शिक्षक सेनेचे कृष्णा धनवडे यांची भाषणे झाली.अनिल चव्हाण यांनी स्वागत केले, प्रास्ताविक सी.के. पाटील यांनी केले.संजय चव्हाण यांनी आभार मानले.