एकनाथ शिंदे नवे मुख्यमंत्री


मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा धक्कादायक घडामोडी घडल्या असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मास्टर स्ट्रोक खेळला आहे. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आज (गुरुवार ३० जून) संध्याकाळी ७.३० वाजता शपथ घेणार आहेत.

महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवत भाजपने जास्त आमदार असूनही मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री होण्याऐवजी महाराष्ट्राचा किंमगेकर होऊन नवे राजकीय समीकरण विकसित केले आहे. याआधी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील अशी चर्चा होती. प्रत्यक्षात फडणवीस यांनीच स्वतः घोषणा केली आणि एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचे जाहीर केले.

उद्धव ठाकरे यांचे समर्थन करणाऱ्या शिवसेना आमदारांनी जाहीरपणे एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार चालविणे म्हणजे शिवसेनेवर अन्याय आहे, अशी भाषा आमदार बोलू लागले. हळू हळू आमदारांच्या संख्येत वाढ होत गेली. ही संख्या वाढली आणि बहुमत चाचणीला सामोरे जाण्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणे पसंत केले.

महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही पक्षात मोठ्या प्रमाणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात नाराजीचे सूर उमटू लागले. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यात सत्तेत असताना हा प्रकार घडला. उद्धव ठाकरे यांची विधीमंडळातील शिवसेना आमदारांवरील पकड ढिली झाली. यानंतर ठाकरे सरकारने राजीनामा दिला. या घडामोडींमध्ये एकनाथ शिंदे यांची भूमिका महत्त्वाची असल्यामुळे भाजपने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नवे सरकार स्थापन करण्याचा तसेच या सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

🤙 9921334545