बांबवडे : शिक्षक संघ सत्तारूढ पॅनलचे उमेदवार लोकशाही पद्धतीने निवडले आहेत. प्रत्येक तालुक्याला उमेदवार ठरविण्याचे स्वातंत्र्य दिले होते. तालुका कार्यकारणीने निवडलेल्या शिक्षक कार्यकर्त्यालाच उमेदवारी दिली आहे. प्राथमिक शिक्षक संघात लोकशाही आहे. लोकांनीच उमेदवार निवडल्याने सभासदांचा मोठा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे सत्तारूढ पॅनेलचा विजय निश्चित आहे असा आत्मविश्वास सत्तारूढ गटाचे पॅनेलप्रमुख राजाराम वरुटे यांनी व्यक्त केला.


बांबवडे येथे शाहुवाडी तालुका उमेदवार बाबासो साळोखे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या शिक्षक मेळाव्यात ते बोलत होते.
वरुटे म्हणाले, सत्तारूढ गटाचे उमेदवार निवडणुकीपूर्वीच निश्चित झाले आहेत. लोकशाही पद्धतीने उमेदवार निवडल्याने कोणीही बंडखोरी केली नाही. सर्वसमावेशक पॅनेल झाल्याने सभासद वर्गातून मोठे पाठबळ मिळत आहे.त्यामुळे शिक्षक संघ सत्तारूढ गट या निवडणुकीत हॅट्ट्रिक केल्याशिवाय राहणार नाही.
सुकाणू समितीचे सदस्य दिलीप बच्चे म्हणाले, बाबा साळोखे हा शिक्षकांच्यासाठी सदैव धडपडणारा कार्यकर्ता आहे. त्यांना मताधिक्यांनी विजयी करावे.
शिवाजी रामा पाटील म्हणाले, शिक्षक कार्यकर्त्यांनी संघटनेशी बांधिल राहून सत्तारूढ पॅनेलला साथ द्यावी.
उमेदवार बाबा साळोखे म्हणाले, चाळीस वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पतसंस्थेच्या ठेवी ज्या विरोधी उमेदवाराला वाढविता आल्या नाहीत, त्यांना शिक्षक बँकेच्या कारभारावर बोलण्याचा अधिकारच नाही.
याप्रसंगी शिक्षक बँकेचे चेअरमन बाजीराव कांबळे, संघाचे जिल्हाध्यक्ष संभाजी बापट, संदीप पाडळकर, कृष्णात धनवडे, एम. आर. पाटील आदींची भाषणे झाली.
यावेळी अशोक पाटील, युवराज काटकर, डी. पी. शिंदे, धोंडीराम खोंगे, राजू पोवार, डी. जी. पाटील, प्रकाश काळे, सौख्या शिंदे आदी उपस्थित होते.
एम. एम. गुरव यांनी स्वागत केले. संचालक साहेब शेख यांनी प्रास्ताविक केले. गोविंद देसाई यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत मोहिते यांनी आभार मानले.