मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा फैसला उद्या, ३० जून रोजी होणार असून बंडाचा झेंडा हाती घेतलेली शिंदेसेना उद्या मुंबईत पोहचणार आहेत. उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीच्या प्रक्रियेत आम्ही सर्व आमदार सहभागी होणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी आज दिली.

गुवाहाटीत असलेल्या एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी महाकामाख्य देवीचे दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे म्हणाले, महाकामाख्य देवीचं दर्शन आता घेतलेलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेला चांगले सुगीचे दिवस, सगळ्यांना सुख समाधानाचे दिवस मिळावे म्हणून देवीचं दर्शन घ्यायला आलो आहे. महाकामाख्य देवीच्या भूमीमध्ये आल्यानंतर दर्शन घेणं हे सर्वांच्याच श्रद्धेचा विषय आहे. म्हणून दर्शन घेतलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या सुख, समाधान व समृद्धीसाठी. महाकामाख्या देवीकडे सर्वच भक्त येतात आणि देवी आशीर्वाद देते, असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
सर्व आमदारांना घेऊन फ्लोअर टेस्टला जाणार आहे. फ्लोअर टेस्टची जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्यासाठी जाणार आहोत. यासाठी आम्ही सर्व आमदार उद्या, ३० जून रोजी मुंबईत पोहोचणार आहोत, असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी जाहीर केले.
दरम्यान, शिंदे गटाने पुकारलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पत्र पाठवून ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. उद्या, ३० जून रोजी फ्लोअर टेस्ट घ्यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या आदेशाच्या विरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात गेली असून या प्रकरणावर आज सायंकाळी पाच वाजता सुनावणी होणार आहे.