१० जूनला राज्यसभा, २० जूनला विधान परिषद, आता ३० जूनला ‘काय’?

मुंबई: जून महिना महाविकास आघाडी सरकारसाठी धोकादायक ठरला असून या महिन्यात सरकारचे अस्तित्व संपण्याची वेळ आली आहे. १० जूनला राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीस धोबीपछाड बसली. त्यानंतर २० जूनला विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे पानिपत झाले. आता ३० जूनला सरकारच्या बहुमत चाचणीसाठी मतदान होणार असून यातून सरकारचीच अग्निपरीक्षा होणार आहे.

एकनाथ शिंदे गटाने पुकारलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पत्र पाठवून ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. उद्या, ३० जून रोजी फ्लोअर टेस्ट घ्यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. मात्र, या आदेशाविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असून या प्रकरणी आज सायंकाळी पाच वाजता सुनावणी होणार आहे.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदे गटाच्या आमदारांनी बंडाचा झेंडा फडकवला असल्यामुळे शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपला पाठिंबा द्यावा, ही भूमीका घेऊन शिंदे गटाने मोठ्या प्रमाणात बंड करून सुरवातीला सुरत आणि आता गुवाहाटी गाठून ठाकरे सरकारला दणका दिला. कोणत्याही परिस्थितीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाठिंबा देणार नाही, अशी भूमीका शिंदे गटाने घेतली आहे.

या सर्व राजकीय अस्थिरतेमुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहे. उद्या ३० जून रोजी सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत विशेष अधिवेशन बोलावून बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहे. हे अधिवेशन केवळ बहुमत चाचणीसाठी बोलवावे. कोणत्याही परिस्थितीत सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही सर्व प्रक्रिया संपवण्याचे स्पष्ट निर्देश कोश्यारी यांनी या पत्राद्वारे दिले आहे. हेड काऊंट पद्धतीने ही बहुमत चाचणी घ्यावी, असे आदेशात म्हटले आहे. म्हणजे आवाजी मताने हे बहुमत चाचणी घेता येणार नाही. सन २०१४ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यावेळी आवाजी मतदानाने फडणवीस सरकारने बहुमत सिद्ध केले होते. अशा पद्धतीची पळवाट यावेळी करता येणार नसल्याची खबरदारी यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी यावेळी घेतलेली दिसते. यामुळे ठाकरे सरकारची उद्या ३० जून रोजी अग्निपरीक्षा ठरणार आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा फैसला येणे अपेक्षित आहे.

🤙 8080365706