शिक्षक मित्रांनी दिलेला निवडणूक मदतनिधी शाळांच्या विकासासाठी खर्च करणार : शिवाजी रोडे – पाटील

शाहुवाडी( प्रतिनिधी ) : शाहूवाडी तालुक्यातील शिक्षक सभासदांनी तीन लाख एकवीस हजार रुपये इतक्या रकमेचा दिलेला निवडणूक मदत निधी हा शाहूवाडी तालुक्यातील दुर्गम भागातील शाळांच्या विकासासाठी खर्च करणार, असा शब्द शाहुवाडी तालुका सर्वसाधारण गटाचे उमेदवार शिवाजी रोडे पाटील यांनी दिला. राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडीच्या शाहूवाडी तालुक्यातील प्रचार मेळाव्यात ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले शाहुवाडी तालुका हा वाड्यावस्त्यांचा तालुका आहे. या तालुक्यातील शिक्षक मित्रांनी निवडणूक मदत निधी देऊन माझ्यावरती उपकार केलेत.त्यांची परतफेड ही शाळांच्या विकासातून करेन. शिक्षक बँकेचा वापर हा केवळ सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी नव्हे तर शाळांच्या विकासासाठी कसा होईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन.
सत्ताधाऱ्यांनी शिक्षक बँकेला स्वतःची खाजगी मालमत्ता समजून सभासदांची आर्थिक लूट केली आहे. महाराष्ट्रातील इतर बँकांशी तुलना करता शिक्षक बँकेचा कारभार हा अत्यंत ढिसाळ आहे. नियोजनशून्य आर्थिक कारभार वारेमाप खर्च आणि बेशिस्तपणा यामुळे बँकेची अधोगती सुरू आहे .बँकेला प्रगतीपथावर नेण्यासाठी सहकाराचा अभ्यास असणाऱ्या जाणत्या संचालकांची गरज आहे आणि ती गरज शाहू आघाडीच्या माध्यमातून पूर्ण होईल. कारण या पॅनेलमध्ये असणारे सर्वच उमेदवार हे सहकाराचा अभ्यास असणारे आहेत.विविध सहकारी संस्थांचे नेतृत्व केलेले आहेत म्हणूनच या परिवर्तनासाठी सर्वसामान्य शिक्षक स्वतः निधी येतो. सामान्य शिक्षकांच्या मनात परिवर्तनाबद्दल किती जोशआहे हे जाणवते .या सामान्य शिक्षक बांधवांचा आवाज म्हणून बँकेचा कारभार आदर्श करू. यासाठी सभासदांनी आघाडीच्या पाठीशी पूर्ण ताकदीनिशी उभे राहवे.

यावेळी जोतिराम पाटील म्हणाले शिक्षक बँकेचा तेरा वर्षातील कारभार हा बँकेच्या इतिहासातील अंधार युगाचा काळ आहे. जे १३ वर्षात केलं नाही ते आता करु याच्या भुलथापा ते मारत आहेत. आम्ही दिल्या शब्दांना जागणारे आहोत. आमची नीती सभासदांची आर्थिक उन्नती हे आमचं घोषवाक्य आहे.

यावेळी सदाशिव कांबळे, उमेश कुंभार, प्रमोद तौंदकर, रवी पाटील सुनील पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.

स्वागत हेमंत भालेकर, सूत्रसंचालन विजयकुमार गावडे यांनी केले. आभार विक्रम पोतदार यांनी मानले.
या मेळाव्यास शिक्षक नेते विलास चौगले, संजय तळप, संजय काळे, एस, के, पाटील, संजय जगताप, जानकर, बी. के. पाटील, नाना कांबळे, जहांगीर मुलानी, विक्रम पोतदार उमेश कुंभार, सुधाकर चव्हाण, तोसीफ पटेल, चंद्रकांत पाटील, सुकुमार मानकर आदी उपस्थित होते.