सेवा सोसायटी शेतकर्‍यांची आर्थिक जननी : आमदार जयश्री जाधव

कोल्हापूर : सेवा सोसायटी ही शेतकर्‍यांची आर्थिक जननी आहे. पालकमंत्री सतेज पाटील व सर्व सभासद शेतकरी यांनी विश्वासाने अशा खंडातील सर्वात मोठ्या सोसायटीचा कारभार तुमच्या हातात दिलेला आहे. यामुळे तुमची जबाबदारी वाढली असून संस्थेची आणि सभासदांची प्रगती साधण्यासाठी सर्वांनी एकदिलाने कामकाज करावे आणि सोसायटीचा नावलौकिक वाढवा, असे आवाहन आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी केले.

कसबा बावडा येथील श्रीराम सेवा सोसायटीच्या नूतन संचालकांचा सत्कार समारंभात त्या बोलत होत्या.

आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, शेतकर्‍यांना आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी सेवा सोसायटीचा मोठा आधार आहे. सेवा सोसायटीच्या माध्यमातून सर्वाधिक शेतकर्‍यांना फायदा मिळाला पाहिजे. यासाठी नूतन संचालक मंडळाची जबाबदारी वाढली असून, शेतकरी हिताचे निर्णय घेऊन सर्व जण चांगला आदर्श घालून देतील.

श्रीराम सोसायटी आणि सभासद शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आपण कायम सहकार्य करू, असा शब्द आमदार जयश्री जाधव यांनी दिला.

सोसायटीच्या माध्यमातून सभासद शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्याचा निश्चित प्रयत्न नवनिर्वाचित संचालक मंडळ करेल, असा विश्वास नूतन संचालक रमेश रणदिवे यांनी व्यक्त केला.

आमदार जयश्री जाधव व उद्योजक सत्यजित जाधव यांच्या हस्ते नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी अनंत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

उमाजी उलपे, युवराज उलपे, धनाजी गोडसे, राजीव चव्हाण, हिंदूराव ठोंबरे, अनंत पाटील, मारुती पाटील, मिलिंद पाटील, संतोष पाटील, तानाजी बिरेजे, रमेश रणदिवे, विलास वाडकर, शीतल पाटील, सविता रणदिवे, सुभाष गदगडे, पुणैद्रु गुरव, दत्तात्रय मासाळ आदी उपस्थित होते. आभार युवराज उलपे यांनी मानले.