ठाणे : एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाच्या समर्थनार्थ ठाण्यात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर त्यांच्या समर्थकांनी शक्तिप्रदर्शन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी गाडीवर उभा राहून समर्थकांशी संवाद साधला.

समर्थकांच्या हातात बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या पोस्टर्ससह शिवसेना नावाचा उल्लेख असलेले आणि धनुष्यबाणाची निशाणी असलेले झेंडे होते. लुईसवाडी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता आणि त्याच बरोबर सेवा रस्ते बंद केले होते. ठाण्यात जोरदार पाऊस सुरू झाला असून अशा परिस्थतीतही शिंदे समर्थक पावसात भिजून घोषणा देत होते.
दरम्यान, आज शिवसेनेच्या बैठकीत, आधी नाथ होते, आता दास झाले, अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत उद्धव ठाकरे कमालीचे आक्रमक झाले होते. शिवसेना निखारा आहे, त्यावर पाय ठेवला तर जाळून टाकू… हिंमत असेल तर स्वतःच्या बापाच्या नावानं मतं मागा, असा घणाघात त्यांनी बंडखोरांवर केला.
