मुंबई : एकनाथ शिंदेंसाठी काय कमी केलं? ‘नगरविकास खात्यासह माझ्याकडची दोन खाती दिली. मात्र माझं मुख्यमंत्रिपद यांना मान्य नसणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे. झाडाची फुलं न्या, फांद्या न्या, मूळ मात्र नेऊ शकत नाही, असा घणाघात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. उद्धव ठाकरेंनी शिवसेना भवनात राज्यातील सर्व जिल्हा प्रमुख आणि जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक बोलावली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, मेलो तरी सेना सोडणार नाही असे म्हणणारेही पळून गेलेत. मला सत्तेचा लोभ नाही, वर्षा सोडून मातोश्रीवर आलो. कोण कसं वागलं यात मला जायचं नाही. मला वाटलं सीएमपदाची खुर्ची हलतेय, मात्र ते मानेचं दुखणं होतं. कोरोनामुळे डोळ्यात पाणी आलं ते अश्रू नाहीत. मी बरा होऊ नये म्हणून काही जण पाण्यात देव ठेवून बसले होते, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. ठाकरे आणि शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा, माझा फोटो न वापरता लोकांमध्ये वावरून दाखवा. बंडखोरांकडून सेना फोडण्याचं पाप करण्यात आलंय. जे सोडून गेले त्यांचं मला वाईट का वाटावं. आमदारांना फूस लावून मी सत्तानाट्य का घडवेन. एकनाथ शिंदेंसाठी काय कमी केलं?, नगरविकास खातं दिलं. माझ्याकडची दोन खाती शिंदेंना दिली. संजय राठोडांवर वाईट आरोप झाले, मात्र त्यानंतरही मी त्यांना सांभाळलं, असा लेखाजोगाही त्यांनी वाचून दाखवला.
विठ्ठल-बडव्यांवर जे बोलत आहेत, त्यांचा पोरगा खासदार आहे. बाहेरच्या भाडोत्री लोकांकडून आपल्यात वाद निर्माण करायचा प्रयत्न सुरू आहे. आपलीच काही लोक घेऊन सेनेवर सोडण्यात आली. सेनेच्या अस्तित्वावर बोलणाऱ्यांना निष्ठा काय असते दाखवावी लागेल. मला वीट आलाय, म्हणजे मी वीट हाणणारच, यांना ठेवून काय करू हे सारं भाजपने केलंय, त्यांची आग्र्याहून सुटका करावीच लागेल. तुम्हाला जर भविष्य दिसत असेल तर खुशाल जा, मी लायक नसेन तर पद सोडायला तयार आहे, मुख्यमंत्रिपद माझ्यासाठी गौण आहे.
या बैठकीला युवा नेते आदित्य ठाकरे, नीलम गोरे यांच्यासह शिवसेना नेते उपस्थित होते.