कोल्हापूर : राज्यात सध्या ज्या राजकीय हालचाली सुरू आहेत, त्याच्याशी भाजपचा काडीमात्र संबंध नाही, असा खुलासा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केला. एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपला कोणताही प्रस्ताव आला नसून तसा प्रस्ताव आल्यास त्यावर विचार केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे गेले तीन दिवस सतत कार्यकर्त्यांच्या कामासाठी दिल्लीला जात आहेत. शिवसेनेतील बंडामागे कोणता राष्ट्रीय पक्ष आहे हे शिंदे यांनाच विचारावं लागेल. राज्यात ज्या काही हालचाली सुरू आहेत, त्या टीव्हीवरच दिसतात, आपला त्याच्याशी संबंध नाही. शिंदे यांच्यासोबत कोण गेलेत, कोण जाणार आहेत, कोण परत येणार आहेत याबाबत आपल्याला काहीही माहित नाही. शरद पवार , संजय राऊत यांना जरा जास्तच अभिव्यक्तिस्वातंत्र्य असल्याने ते सतत बोलत असतात. राऊत तर सकाळी एक तर दुपारी दुसरेच बोलतात.
ते म्हणाले, शिंदे यांच्यासोबत मोहित कांबोज असतील तर ते एकनाथ शिंदे यांचे मित्र असल्याने सोबत असतील. कांबोज हे सर्व पक्षातील नेत्यांचे मित्र आहेत त्यामुळे कदाचित ते सर्वत्र दिसतात. एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपला कोणताही प्रस्ताव आला नाही, प्रस्ताव आला तर पक्षाची १३ जणांची कार्यकारणी आहे, त्यापुढे चर्चा करून तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जाईल. मी सध्या कोल्हापुरात आलो आहे, माझे रुटीन कार्यक्रम सुरू आहेत. काही राजकीय हा हालचाली भाजपकडून सुरू असत्या तर मला कोल्हापुरात येऊ दिले असते का?, असेही ते म्हणाले.