कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी परफेक्ट ‘नियोजन’ करत थेट गुवाहाटी गाठली असून त्यांनी आपली निष्ठा एकनाथ शिंदे यांच्या चरणी वाहिली आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन आमदार नाही नाही म्हणत त्यांच्या सोबत गेले. यामध्ये प्रकाश आबिटकर आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा समावेश होता. मात्र आज सकाळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे गुवाहाटी येथील हॉटेल रेडिसन ब्लूवर पोहोचले. आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गोटात ते सामील झाले.
मुळात राजेश क्षीरसागर हे शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. मात्र ते ठाकरे यांच्यासोबतच राहिले आणि राज्यात नवीन सरकार आले तर त्यांचे कॅबीनेट दर्जाचे पद धोक्यात येऊ शकते. यामुळे दोन दिवसाच्या प्रतिक्षेनंतरही त्यांनीही शिंदे यांच्यासोबत जाणे पसंत केल्याची चर्चा आहे. त्यामुळे मातोश्रीचा निष्ठावंत समजल्या जाणाऱ्या राजेश आदेश यांनी आपली निष्ठा एकनाथ शिंदे यांच्या चरणी वाहिली आहे.