एकनाथ शिंदेंचा ‘आदेश’, धावला ‘निष्ठावंत’ राजेश !

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत ‘मातोश्री’चा आदेश’ थांबला ‘निष्ठावंत’ राजेश असे ज्यांचे कौतुक झाले ते राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे आता एकनाथ शिंदे यांचा आदेश आणि धावला निष्ठावंत राजेश ठरले आहेत. त्यांनी आता आपली निष्ठा एकनाथ शिंदेना वाहिली आहे.

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनीही एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यात सेनेला मोठे खिंडार पडले आहे. राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर आणि आमदार प्रकाश आबिटकर यांच्यापाठोपाठ क्षीरसागर यांनीही ‘मातोश्री’ला जय महाराष्ट्र केला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रकाश आबिटकर आणि राजेंद्र पाटील -यड्रावकर हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. आता क्षीरसागर हे शिंदे यांच्यासोबत गेले आहेत.

कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणुकीत लढवण्यासाठी राजेश क्षीरसागर हे इच्छुक होते. त्यावेळी त्यांची सर्व पातळीवरून मनधरणी करण्यात येत होती. त्यावेळी ‘मोतोश्री’वर बोलावून त्यांची समजूत काढण्यात आली होती. त्यानंतर उत्तरच्या निवडणुकीच्या प्रत्येक प्रचार सभेत महा विकास आघाडीकडून ‘मातोश्री’चा आदेश आणि निष्ठावंत राजेश असा गौरव राजेश क्षीरसागर यांचा करण्यात आला होता. जयश्री जाधव यांच्या विजयानंतर तर कोल्हापूर शहरातील प्रत्येक चौकात मातोश्रीचा आदेश आणि निष्ठावंत राजेश म्हणून मोठमोठी होर्डिंग्ज लागली होती. मात्र. तीन महिन्यातच मातोश्रीचे निष्ठावंत असणारे राजेश हे आता एकनाथ शिंदे यांचा निष्ठावंत राजेश बनले आहेत.

मुळात क्षीरसागर हे शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. ते ठाकरे यांच्यासोबतच राहिले आणि राज्यात नवीन सरकार आले तर त्यांचे कॅबीनेट दर्जाचे पद धोक्यात येऊ शकते. यामुळे दोन दिवसाच्या प्रतिक्षेनंतरही त्यांनीही शिंदे यांच्यासोबत जाणे पसंत केल्याची चर्चा आहे.

🤙 8080365706