मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे ४० पेक्षा जास्त शिवसेनेचे आमदार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी बोलावलेल्या बैठकीत जे आमदार उपस्थित होते, ते देखील आता शिंदे यांच्या गटात जात आहेत. आमदार फुटले की पाठवले अशी शंका उपस्थित केली जात असल्याने संशयाचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची धाकधूक वाढली आहे.
यापूर्वी शिवसेनेत अनेक नेत्यांनी बंड केले. पण त्यांच्या पाठीमागे देखील इतके आमदार कधीही गेले नाही. मग एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे इतके आमदार कसे काय? शिवसेनेचे निष्ठावंत आणि उद्धव ठाकरे यांचे अतिशय निकटवर्ती आमदारदेखील शिंदे यांना पाठिंबा कसे देतात? हे आमदार स्वतःहून जात आहेत की त्यांना शिवसेनेतच कोणी मोठा नेता जाण्याचा सल्ला देत आहे? असा सवाल देखील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते उपस्थित करीत आहेत. काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत देखील या संदर्भात सूर उमटला आहेत.
शिवसेनेत याआधी छगन भुजबळ गणेश नाईक नारायण राणे राज ठाकरे यासारख्या दिग्गज नेत्यांनी नाराजी व्यक्त करत बंड पुकारले होते. मात्र त्यांच्या पाठीमागे देखील इतक्या मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे आमदार कोणीच गेले नाही. आता मात्र एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे इतके आमदार कसे जात आहेत? असा सवाल उपस्थित केला जात आहे.