‘तर’ महाविकास आघाडीतून बाहेर पडणार : संजय राऊत

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांनी २४ तासांच्या आत मुंबईत यावं, आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करू आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा विचार करू, असं आवाहन खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

राऊत म्हणाले, तुमचं म्हणणं आहे ना, आघाडीतून बाहेर पडा, नक्की विचार करु, पुढच्या २४ तासांत बंडखोर आमदारांनी मुंबईत यावं. तुमची अधिकृत भूमिका शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडावी. तुमच्या मागणीचा नक्की विचार केला जाईल. सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या मागण्या मांडण्यापेक्षा समोर येऊन तुमच्या ज्या काही मागण्या असतील त्या मांडा, तुमच्या मागण्यांचा उद्धव ठाकरे नक्की विचार करतील, फक्त पुढच्या २४ तासांत मुंबईत या”, असे आवाहन संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना केले आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी शिंदेंच्या तावडीतून सुटून आलेल्या दोन आमदारांवरची आपबितीही सांगितली आहे. कैलास पाटील आणि देशमुख यांची कहाणी थरारक आहे. त्यांचं अपहरण करून भाजपने त्यांना नेलं, त्यांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यांच्या ताब्यातील २१ आमदारांचा संपर्क आमच्याशी झालाय. तुम्ही कितीही फोटो, व्हिडिओ पाठवले तरी ज्यादिवशी ते मुंबईत येतील त्यातील २१ आमदार शिवसेनेबरोबर असतील, त्यांच्याशी ठाकरेंची चर्चा झाली आहे. विधानसभेतही महाविकास आघाडीचा विजय होईल, एवढा आकडा आमच्याकडे आहे, असंही संजय राऊतांनी सांगितलं.