एकनाथ शिंदे यांचा थेट धनुष्य बाणावरच ‘नेम’

मुंबई : शिवसेना हा मूळ पक्ष आणि पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह आपल्याच गटाकडे कसं येईल, यासाठीच्या कायदेशीर लढाईवर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी लक्ष केंद्रित केलं आहे. पक्षाचे दोन तृतीयांश आमदार माझ्यासोबत आहेत. त्यामुळे माझ्यासोबत असलेला गट हाच शिवसेना विधिमंडळ पक्ष असा दावा शिंदे यांच्याकडून केला जाऊ शकतो.

दोन तृतीयांश आमदार फोडण्यात यशस्वी झालेल्या एकनाथ शिंदे यांनी आता पक्षच ताब्यात घेण्याची तयारी सुरू केली आहे. आपलाच गट हा अधिकृत शिवसेना असल्याचं सांगत शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर एकनाथ शिंदे दावा करण्याची शक्यता आहे. शिंदे यांच्या बंडाला वाढता प्रतिसाद मिळत आहे. आज शिंदे समर्थक आमदारांची संख्या सातनं वाढली आहे. दीपक केसरकर, दादा भुसे, मंगेश कुडाळकर, आशिष जैस्वाल, मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर, संजय राठोड गुवाहाटीत पोहोचले आहेत. यातील जैस्वाल हे शिवसेनेच्या समर्थनानं निवडून आलेले आहेत. तर बाकीचे सहा आमदार सेनेचे आहेत. यानंतर आता शिंदे विधानसभा उपाध्यक्षांना पत्र लिहिणार आहेत.

शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी करून अजय चौधरी यांची विधीमंडळ पक्षाच्या गटनेते पदी नियुक्ती करण्यात आली. एकनाथ शिंदे यांनी या नियुक्तीला आक्षेप घेतला. प्रत्युत्तर म्हणून शिंदे यांच्या गटानं सुनील प्रभू यांची प्रतोद पदावरून हकालपट्टी करून भरत गोगावले यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती केली. तिथूनच खऱ्या अर्थानं कायदेशीर शहकाटशहाला सुरुवात झाली आहे.