कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी -भुदरगडचे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबीटकर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गोटात गेले असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे सहयोगी आमदार, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकरही बंडखोर आमदारांच्यासोबत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे सुद्धा एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आहेत. विमानतळावरील समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ते कैद झाले आहेत.
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा फोटो समोर आल्यानंतर बरेच चेहरे समोर आले आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदे यांच्यासोबत ३५ पेक्षा जास्त आमदार असल्याची बातमी समोर येत होती. विशेष म्हणजे शिंदे यांच्यासोबत नेमके कोणकोणते आमदार आहेत याची थेट माहिती देणारा फोटोच आता समोर आला आहे. विशेष म्हणजे मंत्री बच्चू कडू, मंत्री शंभुराज देसाई यांच्यासोबत कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्याचे आमदार मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर या आमदारांसोबत आहेत आहे. याअगोदर प्रकाश आबिटकर सामील झाले आहेत.
काल सायंकाळपर्यंत आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर हे आपण मातोश्रीवर जाणार असल्याचे सांगत होते. कोल्हापुरातून ते मातोश्रीला जाण्यासाठी निघाले पण नंतर ते बंधू संजय यांच्यासह गुवाहाटीला गेले. ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ते अपक्ष म्हणून निवडून आले होते, शिवसेनेचे शिवबंधन बांधल्यानंतर त्यांना मंत्री पदाचे बक्षीस मिळाले होते.
